मेक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पुलाला धडकले   

न्यूयॉर्क : मेक्सिकन नौदलाचे कुआउतेमोक हे प्रशिक्षण जहाज न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन पुलावर आदळले. शनिवारी संध्याकाळी जहाज पुलाखालून जात असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, १९ जण जखमी आहेत. त्यामधील चौघांची प्रकृती गंभीर आहे.  
 
कुआउतेमोक जहाजामध्ये क्रू मेंबर्ससह २७७ नागरिक होते. हे जहाज एका मैत्रीपूर्ण भेटीसाठी न्यूयॉर्कला आले होते. शनिवारी रात्री ऐतिहासिक ब्रुकलिन पुलाला ते धडकले. यात दोन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आणि १९ जण जखमी झाले.न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स म्हणाले की, या अपघातामुळे १४२ वर्षे जुन्या पुलाचे मोठे नुकसान झाले नाही; परंतु जहाजाचे नुकसान झाले आहे. 
 
अनेक प्रत्यक्षदर्शींनी बनवलेल्या चित्रफीतींमध्ये हे जहाज नदीत ब्रुकलिन पुलाकडे वेगाने जात असल्याचे दिसून येते. पुलाच्या मुख्य भागावर आदळल्यानंतर जहाजाचे तीन मास्ट एक-एक करून तुटताना दिसत आहेत. या जहाजावर हिरवा, पांढरा आणि लाल रंगाचा मोठा मेक्सिकन ध्वज होता. मेक्सिकन नौदलानुसार, हे जहाज २९७ फूट लांब आणि ४० फूट रुंद असून, ते १९८२ मध्ये पहिल्यांदा पाण्यात उतरले. नौदल आणि स्थानिक अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दरम्यान, ब्रुकलिन पुल अंदाजे १ हजार ६०० फूट लांब आहे. १८८३ मध्ये या पुलाचे उद्घाटन झाले होते.

Related Articles